इतरांना हरवणे सोपे असते, पण स्वतःच्या अहंकाराला, क्रोधाला, मत्सराला, भीतीला, असुरक्षिततेला आणि मोहाला हरवणे ही खरी कसोटी असते. बाहेरच्या जगावर विजय मिळवणारा माणूस कदाचित शक्तिशाली दिसतो, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणारा माणूस खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान असतो.
आपण आयुष्यभर काही ना काही जिंकण्यासाठी धावत असतो..पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता, संपत्ती आणि इतरांची मान्यता…पण या सगळ्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही जर मनात अस्वस्थता, असुरक्षितता आणि अहंकाराचा कोलाहल असेल, तर त्या विजयाला अर्थ उरत नाही.
कारण जग जिंकण्यापेक्षा मन जिंकणे अधिक कठीण आहे..ज्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते, संकटातही विवेकाची ज्योत तेवत ठेवता येते, अपमानाला संयमाने सामोरे जाता येते, यशात अहंकाराला दूर ठेवता येते आणि अपयशातून पुन्हा उभे राहता येते..तोच खरा विजेता!
स्वतःवर विजय म्हणजे स्वतःला दडपणे नव्हे, तर स्वतःला समजून घेणे.
आपल्या कमतरतांकडे प्रामाणिकपणे पाहणे, चुका स्वीकारणे, स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे आणि प्रत्येक दिवसागणिक कालच्या स्वतःपेक्षा आजचा स्वतः अधिक चांगला घडवणे हीच आत्मविजयाची खरी वाट.
आपल्याला जग बदलायचे असेल, तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. समाज बदलण्यापूर्वी विचार बदलावे लागतात. परिस्थिती बदलण्यापूर्वी दृष्टिकोन बदलावा लागतो, आणि भविष्य बदलण्यापूर्वी वर्तमानातील सवयी बदलायला हव्यात.
मनातला अंधार दूर झाला की बाहेरच्या प्रकाशाची गरज कमी भासते.
अंतर्मनात शांतता निर्माण झाली की बाहेरच्या टाळ्यांचा आवाज क्षीण वाटतो.
आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचे आहे. पण या धावपळीत आपण एक महत्त्वाचा प्रश्न विसरतो, “मी जगाच्या नजरेत किती मोठा झालो?” यांपेक्षा “मी माझ्या स्वतःच्या नजरेत किती उंचावलो?”
हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे..
कारण पद तुमच्यापेक्षा मोठे असू शकते, पैसा तुमच्यापेक्षा अधिक असू शकतो, प्रसिद्धी तुमच्यापेक्षा पुढे जाऊ शकते; पण तुमचे चारित्र्य, तुमची मूल्ये आणि तुमची अंतःशांती यांची जागा कोणतीही संपत्ती घेऊ शकत नाही.
खरा विजय म्हणजे इतरांना खाली खेचून वर जाणे नव्हे,.तर स्वतःला उंचावताना इतरांनाही उंचावणे.खरा विजय म्हणजे गर्दीत स्वतःची ओळख निर्माण करणे नव्हे, तर एकांतातही स्वतःशी प्रामाणिक राहणे.
खरा विजय म्हणजे जगाने आपले कौतुक करणे नव्हे, तर रात्री शांतपणे डोळे मिटताना आपल्या अंतर्मनाने आपल्याला दोषी न ठरवणे.
म्हणूनच आयुष्याच्या या अथांग प्रवासात जग जिंकण्याची धडपड करण्यापूर्वी स्वतःला जिंकण्याची कला आत्मसात करा.मनातील अस्वस्थता जिंका, विचारांना सकारात्मकतेची दिशा द्या, विकारांवर विवेकाने मात करा, भीतीच्या सावल्यांना धैर्याने दूर करा, अहंकाराला नम्रतेच्या चरणी विसर्जित करा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कालच्या स्वतःपेक्षा आजचा स्वतः अधिक समृद्ध, सजग आणि सक्षम घडवा. कारण खरा विजय इतरांवर मिळवलेल्या वर्चस्वात नसतो, तर स्वतःच्या मर्यादांवर केलेल्या मातीत आणि अंतर्मनात फुललेल्या आत्मविश्वासात दडलेला असतो…! कारण ज्याने स्वतःच्या मनातील वादळ शांत केले, त्याला बाहेरच्या वादळांची भीती राहत नाही.
ज्याने स्वतःच्या अंतर्मनात प्रकाश निर्माण केला, त्याला जगाच्या अंधाराची चिंता उरत नाही..आणि ज्याने स्वतःला जिंकले…त्याला जग जिंकण्याची गरजच उरत नाही, कारण त्याच्या अंतर्मनातच एक सुंदर, समृद्ध आणि विशाल विश्व जन्माला आलेले असते…!
“ जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर राज्य करा.कारण बाहेरचा विजय क्षणिक असतो,पण अंतर्मनाचा विजय आयुष्याला अर्थ देतो.”
विचार लेखन आणि संपादन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment