“AI ने उत्तरं द्यावीत, पण प्रश्न विचारण्याची, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती माणसाने गमावू नये!” — विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
आज आपण अशा एका निर्णायक वळणावर उभे आहोत, जिथे तंत्रज्ञानाने केवळ आपल्या हातातील साधने बदललेली नाहीत, तर शिकण्याची पद्धत, विचार करण्याची सवय आणि ज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्यास सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता—Artificial Intelligence अर्थात AI—आज प्रयोगशाळेच्या चार भिंतींत बंदिस्त राहिलेली नाही. ती विद्यार्थ्यांच्या अभ्यासात, शिक्षकांच्या अध्यापनात, संशोधनात, लेखनात, भाषांतरात, प्रोग्रामिंगमध्ये आणि करिअरच्या तयारीत वेगाने प्रवेश करत आहे.
या बदलाच्या पार्श्वभूमीवर Massachusetts Institute of Technology अर्थात MIT च्या AI आणि शिक्षणा संदर्भातील समितीने 2026 मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या समितीला अध्यापन, अध्ययन आणि संशोधन प्रशिक्षणावर AI च्या वापराचा परिणाम तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अहवालाने AI च्या वापराला केवळ स्वीकारायचे किंवा नाकारायचे, या द्वंद्वापलीकडे जाऊन एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. AI च्या युगात माणसाने काय शिकावे, कसे शिकावे आणि काय स्वतःच्या बुद्धीने करणे आवश्यक आहे?
हा प्रश्न केवळ MIT किंवा अमेरिकेतील विद्यापीठांचा नाही. तर तो भारतातील प्रत्येक शाळेचा, महाविद्यालयाचा, शिक्षकाचा, पालकांचा आणि विद्यार्थ्याचा प्रश्न आहे.
भारताची तरुण पिढी आज आत्मविश्वासाने जगासमोर उभी आहे. गणित-विज्ञानातील स्पर्धा, ऑलिम्पियाड, क्रीडा, संशोधन, स्टार्टअप्स, डिजिटल तंत्रज्ञान, कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत भारतीय विद्यार्थी आणि तरुण आपली क्षमता सिद्ध करत आहेत. छोट्या शहरांतून आणि ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्ने पाहणारी मुले पुढे येत आहेत. ही ऊर्जा देशाच्या भविष्याबद्दल आशा निर्माण करणारी आहे.
परंतु या आशादायी चित्राची दुसरी बाजूही आपण पाहिली पाहिजे. स्पर्धेचा वाढता दबाव, करिअरची अनिश्चितता, अपयशाची भीती, सामाजिक तुलना, डिजिटल जगातील सततची उपस्थिती आणि वाढता एकाकीपणा यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सामाजिक अनुभवांवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत AI आपल्या शिक्षणव्यवस्थेत प्रवेश करत असताना आपण अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे.
मुळात प्रश्न असा नाही की, “AI वापरायचा की नाही?” प्रश्न असा आहे की, “AI च्या मदतीने विद्यार्थी अधिक जिज्ञासू, स्वतंत्र, चिकित्सक आणि सर्जनशील होत आहे का, की अधिक सोयीस्कर पण अधिक परावलंबी?” याच ठिकाणी शिक्षणाचा एक मूलभूत गैरसमज आपल्या लक्षात घ्यावा लागतो. बरोबर उत्तर मिळाले म्हणजे शिकणे झाले, असे नाही. विद्यार्थी एखादे गणित स्वतः सोडवतो, चुका करतो, पुन्हा प्रयत्न करतो, शिक्षकाला प्रश्न विचारतो आणि शेवटी उत्तरापर्यंत पोहोचतो..या संपूर्ण प्रक्रियेत त्याची तर्कशक्ती, स्मरणशक्ती, संयम, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. AI ने काही सेकंदांत योग्य उत्तर दिले, तर उत्तर मिळाले..परंतु त्यातून शिकण्याची संपूर्ण प्रक्रिया घडलीच असे नाही.
शिक्षण म्हणजे केवळ उत्तरांचे संकलन नाही. शिक्षण म्हणजे प्रश्नांशी झुंजण्याची क्षमता, स्वतःचा बौद्धिक आणि मानसिक विकास..
MIT च्या अहवालात चर्चिलेली “cognitive surrender” अर्थात “बौद्धिक शरणागती” ही संकल्पना याच संदर्भात विचार करायला भाग पाडते. एखादी अडचण आली की प्रथम स्वतः विचार करणे, पुस्तक पाहणे, मित्रांशी चर्चा करणे किंवा शिक्षकाला विचारणे याऐवजी थेट AI कडे उत्तर मागण्याची सवय लागणे, ही दीर्घकालीन दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकते.
यंत्राने आपल्यासाठी प्रत्येक वेळी विचार केला, तर आपल्या विचारशक्तीचा सराव कधी होणार?
शिक्षण ही मुळात बुद्धीची व्यायामशाळा आहे. आपण जिममध्ये जाऊन दुसऱ्याने व्यायाम केला म्हणून आपले स्नायू मजबूत होत नाहीत. त्याचप्रमाणे AI ने विद्यार्थ्याचा निबंध लिहिला म्हणून विद्यार्थ्याची लेखन क्षमता वाढत नाही. AI ने गणित सोडवले म्हणून विद्यार्थ्याची गणिती समज विकसित होत नाही. AI ने संशोधनाचा सारांश दिला म्हणून संशोधनाची सवय तयार होत नाही.
प्रयत्न, चुका, संघर्ष, पुन: र्प्रयत्न आणि आत्मपरीक्षण यातूनच व्यक्तिमत्त्व घडते. शिक्षणातील प्रत्येक अडचण ही अडथळा नसते, अनेकदा तीच बौद्धिक विकासाची पायरी असते.
MIT च्या संबंधित विद्यार्थी सर्वेक्षणांमधूनही या बदलाचे एक महत्त्वाचे चित्र समोर येते. 2025 च्या The Tech विद्यार्थी सर्वेक्षणात 90 टक्के undergraduate respondents यांनी LLMs वर अतिनिर्भरतेबद्दल काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली. त्यापैकी 67 टक्के विद्यार्थी अत्यंत चिंतित होते. 70 टक्के विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी AI proficiency महत्त्वाची वाटत होती, पण केवळ 25 टक्के विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेकडून व्यावसायिक AI वापरासाठी पुरेशी तयारी मिळत असल्याचे वाटले. वेगळ्या MIT campus survey मध्ये 40 टक्के undergraduate respondents यांनी AI मुळे आपण अधिक replaceable झाल्यासारखे वाटत असल्याचे, तर 34 टक्के विद्यार्थ्यांनी AI मुळे आपण अधिक capable झाल्याचे सांगितले.
ही आकडेवारी AI शिक्षणासाठी वाईट आहे, असा निष्कर्ष देत नाही. उलट ती अधिक महत्त्वाचा संदेश देते, विद्यार्थ्यांना AI हवे आहे..पण AI सोबत कसे शिकायचे, याचे स्पष्ट मार्गदर्शनही त्यांना हवे आहे.
AI चा विरोध करणे हा उपाय नाही. योग्य वापर केला तर AI हे अत्यंत प्रभावी शैक्षणिक साधन ठरू शकते. अवघड संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणे, इंग्रजीतील संदर्भांचे मातृभाषेत स्पष्टीकरण घेणे, अतिरिक्त उदाहरणे मिळवणे, सराव प्रश्न तयार करणे, पुनरावृत्ती करणे, अभ्यासाचे नियोजन करणे, भाषांतर करणे, प्रोग्रामिंग समजून घेणे आणि संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कल्पना विकसित करणे अशा अनेक क्षेत्रांत AI विद्यार्थ्यांना मदत करू शकते.
म्हणूनच AI ला शत्रू मानणे जितके चुकीचे आहे, तितकेच त्याला अंतिम शिक्षक मानणेही चुकीचे आहे.
#AI शिक्षकाचा पर्याय नाही, तो शिक्षकाचा सहकारी ठरू शकतो..
UNESCO च्या 2024 च्या AI Competency Framework for Students मध्ये विद्यार्थ्यांसाठी human-centred mindset, AI ethics, AI techniques आणि AI system design या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी AI चा वापर केवळ सुविधा म्हणून न करता जबाबदार, नैतिक आणि सर्जनशील पद्धतीने करायला शिकले पाहिजे.
AI च्या युगात शिक्षकाची भूमिकाही बदलणार आहे. शिक्षक केवळ माहिती देणारा राहणार नाही.. तो मार्गदर्शक, प्रश्नकर्ता, समन्वयक, प्रेरक, मूल्यशिक्षक आणि बौद्धिक सहप्रवासी म्हणून अधिक महत्त्वाचा ठरेल. UNESCO च्या शिक्षकांसाठीच्या AI Competency Framework मध्ये human-centred mindset, AI ethics, AI foundations and applications, AI pedagogy आणि professional learning या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.
म्हणून शिक्षकांनी AI पासून पळून जाण्याऐवजी AI समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना AI वापरायला शिकवतानाच AI वर प्रश्न विचारायला, त्याच्या उत्तरांची पडताळणी करायला आणि आवश्यक त्या वेळी त्याला आव्हान द्यायलाही शिकवले पाहिजे.
कारण भविष्यात माहिती देणारी साधने अनेक असतील,पण माहिती खरी की खोटी हे तपासणारा विवेकी विद्यार्थी अधिक मौल्यवान असेल.
AI वापरासाठी प्रत्येक विषयात स्पष्ट नियम असणे गरजेचे आहे. काही कामांसाठी AI मुक्तपणे वापरता येईल..काही कामांसाठी मर्यादित मदत घेता येईल,तर काही मूल्यमापनांमध्ये AI पूर्णपणे टाळणे आवश्यक असेल. यासाठी “हिरवा-पिवळा-लाल” असा साधा दृष्टिकोन उपयोगी ठरू शकतो.
कल्पना शोधणे, अतिरिक्त उदाहरणे घेणे, भाषांतर करणे किंवा पुनरावृत्ती करणे यासाठी AI चा मुक्त वापर करता येईल. निबंधाची रूपरेषा, भाषिक सुधारणा किंवा संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यात मर्यादित वापर करता येईल. परंतु परीक्षा, तोंडी परीक्षा किंवा विद्यार्थ्याची स्वतःची संकल्पनात्मक क्षमता तपासणाऱ्या काही कामांमध्ये AI वापर टाळणे आवश्यक ठरेल.
#उद्देश AI वर बंदी घालणे नसून शिकण्याचे उद्दिष्ट जपणे हा असावा.
विद्यार्थ्यांसाठी यापेक्षा सोपा नियम असू शकतो, “पहिले मी, मग पुस्तक, मग मित्र, मग शिक्षक आणि शेवटी AI.”
प्रश्न पडला की प्रथम स्वतः विचार करा. पुस्तक आणि नोट्स तपासा. मित्रांशी चर्चा करा. शिक्षकांना विचारा. तरीही अडचण राहिली तर AI ची मदत घ्या. आणि AI कडून उत्तर मिळाल्यावर पुन्हा स्वतः विचार करा.
“AI ने सांगितले म्हणून बरोबर” हा नियम नसावा. त्याऐवजी “AI ने सांगितले..आता मी तपासतो” ही वृत्ती विकसित झाली पाहिजे.
कारण AI देखील चुका करू शकते. माहितीचा संदर्भ चुकीचा असू शकतो, एखादा स्रोत चुकीचा दिला जाऊ शकतो किंवा प्रश्नाचा अर्थ चुकीचा घेतला जाऊ शकतो. म्हणून AI literacy सोबत information literacy देखील अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी विचारायला शिकले पाहिजे हा स्रोत कोणता आहे? माहितीची तारीख काय आहे? मूळ संदर्भ कुठे आहे? दुसऱ्या विश्वसनीय स्रोताने याची पुष्टी केली आहे का? यात तथ्य आणि मत यातील फरक काय आहे? हीच प्रश्न विचारण्याची सवय भविष्यातील खरी बौद्धिक ताकद ठरेल.
या संपूर्ण प्रक्रियेत पालकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. घर ही मुलांची पहिली शैक्षणिक प्रयोगशाळा असते. पालकांनी मुलांना सतत “मोबाईल बंद कर”, “AI वापरू नको” असे सांगण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या डिजिटल सवयींकडेही पाहिले पाहिजे. पालक मुलांसमोर तासनतास reels पाहत असतील, तर मुलांना दिलेला डिजिटल शिस्तीचा उपदेश किती प्रभावी ठरेल?
मुले आपण सांगतो त्यापेक्षा आपण करतो त्यातून अधिक शिकतात..म्हणून पालकांनी मुलांशी रोज काही वेळ मोबाईलशिवाय संवाद साधावा. “आज किती अभ्यास केला?” यापेक्षा “आज तुला कोणता प्रश्न पडला?” असे विचारावे. गुणांपेक्षा प्रयत्नांचे कौतुक करावे. इतर मुलांशी तुलना टाळावी. अपयशाला शिक्षा न बनवता शिकण्याची संधी बनवावी. मुलाने AI वापरले असेल तर त्याला लगेच दोष देण्याऐवजी “AI ने तुला कुठे मदत केली आणि तू स्वतः काय केलेस?” असा संवाद साधावा.
शिक्षणसंस्थांनीही या बदलाला गांभीर्याने सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक संस्थेने AI वापराबाबत स्पष्ट धोरण तयार करणे आवश्यक आहे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी AI literacy, fact-checking, digital privacy, copyright, plagiarism आणि ethical AI use याबाबत नियमित मार्गदर्शन झाले पाहिजे.
Assignment ची रचना देखील बदलण्याची गरज आहे. “निबंध लिहा” एवढ्यावर न थांबता “तुम्ही हा विषय का निवडला?”, “कोणते स्रोत वापरले?”, “AI वापरला असल्यास कुठे वापरला?”, “AI च्या उत्तरात तुम्हाला कोणती चूक आढळली?” असे प्रश्न विचारले पाहिजेत.
तोंडी सादरीकरण, प्रकल्पाधारित शिक्षण, प्रयोग, चर्चा, reflective journal आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यावर आधारित मूल्यमापन यांचा वापर वाढवला पाहिजे.
कारण AI च्या युगात केवळ सुंदर उत्तर मिळवणे सोपे झाले आहे; पण त्या उत्तरामागचा विचार स्वतःचा आहे की नाही हे तपासणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.
AI शोधणाऱ्या software वर अंधविश्वास ठेवणेही योग्य नाही. अशा tools कडून चुकीचे positive results येऊ शकतात आणि निर्दोष विद्यार्थ्यांवर संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संशयावर आधारित शिक्षण संस्कृतीपेक्षा विश्वास, संवाद आणि प्रक्रिया-आधारित मूल्यमापन अधिक योग्य ठरेल.
AI च्या युगातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डिजिटल विषमता. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दुर्बल विद्यार्थी, उच्चगती इंटरनेट असलेले आणि मर्यादित इंटरनेट असलेले विद्यार्थी यांच्यातील दरी वाढली तर AI शिक्षणातील समानतेचे साधन न राहता नव्या शैक्षणिक विषमतेचे कारण बनू शकते..म्हणून AI शिक्षणाची साधने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे.
परंतु AI मुळे निर्माण झालेले प्रश्न शेवटी एका मूलभूत प्रश्नाकडे येऊन थांबतात, शिक्षण कशासाठी?
जर शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे असेल, तर AI विद्यार्थ्यांसाठी मोठा shortcut ठरू शकतो. जर assignment म्हणजे फक्त submission असेल, परीक्षा म्हणजे फक्त गुणांची शर्यत असेल आणि शिक्षण म्हणजे इंटरनेटवरून माहिती मिळवणे असेल, तर AI नक्कीच त्या प्रक्रियेला अधिक वेग देईल.
पण जर शिक्षणाचा उद्देश विचारशील माणूस, संवेदनशील नागरिक, सर्जनशील व्यक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विद्यार्थी आणि जबाबदार समाजघटक घडवणे हा असेल, तर AI कधीही शिक्षणाचा पर्याय ठरू शकत नाही.
भारताच्या शिक्षण परंपरेतही ज्ञानाकडे केवळ रोजगाराचे साधन म्हणून पाहिले गेले नाही. तक्षशिला आणि नालंदासारख्या प्राचीन विद्याकेंद्रांचा उल्लेख भारताच्या बहुविषयक शिक्षण परंपरेच्या संदर्भात National Education Policy 2020 मध्ये करण्यात आला आहे. NEP 2020 मध्ये holistic education, conceptual understanding, creativity, critical thinking, multidisciplinary learning, ethics आणि scientific temper यांवर भर देण्यात आला आहे.
आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी व्यक्तिमत्त्व निर्मितीशी शिक्षण जोडले. रवींद्रनाथ टागोरांनी मुक्त, सर्जनशील आणि निसर्गाशी जोडलेल्या शिक्षणाचा प्रयोग केला. महात्मा गांधींनी शिक्षणात मन, हात आणि हृदय यांच्या एकात्म विकासाचा विचार मांडला.
#AI च्या युगात हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो.
AI कदाचित मनाला माहिती देईल, पण हाताला कौशल्य कोण देणार? हृदयाला संवेदनशीलता कोण देणार? विवेकाला दिशा कोण देणार? ही जबाबदारी अजूनही माणसाचीच आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील creativity, critical thinking, conceptual understanding आणि holistic development यांची उद्दिष्टे AI च्या युगात अधिक अर्थपूर्ण ठरतात.
AI आपल्याला माहिती देईल, शिक्षण त्या माहितीला अर्थ देईल.
AI पर्याय सुचवेल,विवेक योग्य पर्याय तपासेल.
AI मजकूर तयार करेल, माणूस त्यामागची भूमिका ठरवेल.
AI वेग देईल, पण दिशा माणसाने ठरवावी लागेल.
UNESCO च्या AI frameworks चा एक महत्त्वाचा आधार म्हणजे human-centred approach..AI च्या केंद्रस्थानी माणूस, त्याची जबाबदारी, नैतिकता आणि agency असावी..म्हणून AI ला नाकारणे हा मार्ग नाही..पण AI समोर शरण जाणेही मार्ग नाही.
मार्ग आहे विवेकपूर्ण स्वीकार.
आजच्या विद्यार्थ्यांनी एक साधा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे..
आधी स्वतः विचार करा.
आधी वाचा.
आधी चर्चा करा.
मग AI ची मदत घ्या.
महत्त्वाची माहिती तपासा.
आणि शेवटी उत्तर स्वतःच्या शब्दांत समजावून सांगा.
शिक्षकांनी AI ला शत्रू मानू नये.. त्याला समजून घ्यावे. विद्यार्थ्यांना AI वापरायला शिकवतानाच त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे AI वर प्रश्न विचारायला शिकवावे.
पालकांनी मुलांची तुलना करू नये. गुणांपेक्षा प्रयत्नांचे कौतुक करावे. स्क्रीनपेक्षा संवाद वाढवावा. AI वापरल्याबद्दल मुलांना घाबरवण्यापेक्षा त्यांना जबाबदार वापर शिकवावा.
आणि शिक्षणसंस्थांनी AI च्या युगात एक नवीन शैक्षणिक संस्कृती निर्माण केली पाहिजे, जिथे तंत्रज्ञानाला स्थान असेल, पण तंत्रज्ञानापेक्षा माणूस मोठा असेल.
कारण AI आपल्याला वेग देईल.. पण वेग म्हणजे प्रगती नव्हे.
AI आपल्याला माहिती देईल; पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.
AI आपल्यासाठी मजकूर लिहील; पण शब्द म्हणजे विचार नव्हे.
AI आपल्याला पर्याय देईल; पण पर्याय म्हणजे विवेक नव्हे.
AI आपल्याला जगाशी जोडेल; पण connection म्हणजे नाते नव्हे.
म्हणून आज शिक्षणासमोर सर्वांत मोठे आव्हान AI नाही. खरे आव्हान आहे..सुविधा स्वीकारताना आपण आपली बौद्धिक स्वायत्तता गमावणार तर नाही ना?
विद्यार्थ्याने गणित सोडवताना थोडा त्रास सहन केला पाहिजे. निबंध लिहिताना शब्द शोधले पाहिजेत. प्रयोग करताना चुका केल्या पाहिजेत. शिक्षकाला प्रश्न विचारला पाहिजे. मित्राशी मतभेद झाले पाहिजेत. पुस्तकाच्या पानांवर पेन्सिल फिरली पाहिजे. कधी उत्तर मिळाले नाही तरी काही काळ “मला अजून कळलेले नाही” या अवस्थेत राहण्याची तयारी असली पाहिजे.
कारण याच अस्वस्थतेतून प्रश्न जन्माला येतात..
प्रश्नांतून जिज्ञासा जन्माला येते..जिज्ञासेतून शोध जन्माला येतो..आणि शोधातूनच माणूस पुढे जातो.
म्हणूनच, AI ला आपल्या बुद्धीचा पर्याय बनवू नका; आपल्या बुद्धीला अधिक सक्षम बनवणारे साधन बनवा..AI ने तुमच्यासाठी विचार करू नये; AI मुळे तुम्हाला अधिक चांगला विचार करता आला पाहिजे..AI ने तुमची सर्जनशीलता हिरावून घेऊ नये; उलट तुमच्या कल्पनांना पंख द्यावेत.
AI ने शिक्षकाची जागा घेऊ नये..शिक्षक–विद्यार्थी नाते अधिक समृद्ध करावे..आणि सर्वांत महत्त्वाचे, “यंत्र किती बुद्धिमान झाले?” यापेक्षा “माणूस किती विवेकी राहिला?” हा प्रश्न भविष्यात अधिक महत्त्वाचा असेल.
उद्याच्या जगात सर्वाधिक मौल्यवान कौशल्य कदाचित AI वापरणे नसेल.
ते असेल, AI वापरत असतानाही स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याची क्षमता टिकवून ठेवणे.
जिज्ञासा जिवंत ठेवणे.
विवेक जागा ठेवणे.
सर्जनशीलता जपणे.
संवाद टिकवणे.
संवेदनशीलता वाढवणे.
आणि सर्वांत महत्त्वाचे माणूसपण जपणे.
“तंत्रज्ञान हातात असावे; पण विवेक मनात असावा.AI सोबत असावे; पण विचार आपल्या डोक्यात असावा.”
संदर्भ :
1) MIT, Final Report of the Ad Hoc Committee on AI Use in Teaching, Learning, and Research Training, 25 August 2026.
2) MIT GUE - MIT Faculty Governance, AI Use Policy and Resources for Instructors, 25 August 2026.
facultygovernance.mit.edu
3) UNESCO, AI Competency Framework for Students, 2024.
4) UNESCO, AI Competency Framework for Teachers, 2024.
5) Government of India, Ministry of Education, National Education Policy 2020.
धन्यवाद मित्रांनो..🙏
-विचार संकलन,लेखन आणि संपादन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment