शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम शिकवणारे नसतात, तर ते आयुष्याच्या वाटेवर पहिल्यांदा हात धरून दिशा दाखवणारे दीपस्तंभ असतात. माझ्या शैक्षणिक प्रवासात असा एक उजेड म्हणजे आदरणीय सविता देशपांडे मॅडम.
मी आठवीत असताना मॅडम मला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. मराठी विषय… पण प्रत्यक्षात त्या केवळ भाषा शिकवत नव्हत्या; तर त्या विचार करायला, जाणिवा शब्दांत उतरवायला आणि स्वतःशी संवाद साधायला शिकवत होत्या. वर्गाचा मॉनिटर असल्याने पहिल्याच तासापासून त्यांनी माझ्यावर जबाबदारीची आणि विश्वासाची मोहोर उमटवली. मराठी गद्य–पद्य वाचन, मुलांना निबंध लेखनासाठी प्रेरणा देणं..हे सगळं केवळ काम नव्हतं, तर ती एक वैचारिक संस्कारांची प्रक्रिया होती.
दररोज एक-दोन निबंधांचे वाचन, त्यावर चर्चा, शब्दांचा अर्थ समजून घेण्याची सवय… हळूहळू माझं विचार–भावविश्व विस्तारत गेलं. शब्द केवळ शब्द राहिले नाहीत; ते विचारांचे वाहक झाले. शालेय शिक्षणातच मराठी साहित्याची ओढ लागली, आणि ती ओढ पुढे गोड व्यसन बनली आजतागायत टिकलेली आहे, मित्रांनो..
याच बीजातून पुढे दररोज मराठी साहित्य, विविध लेख, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन सुरू झालं. वैचारिक आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग, रोज पाच–सहा तासांची शिकवणी, विविध विषयांवरील व्याख्याने, चर्चा-सत्रे,प्रगत समाज माध्यमांवर प्रभावीपणे व्यक्त होणं..या सगळ्यांतून माझी वैचारिक अभिव्यक्ती अधिक प्रगल्भ होत गेली.
आज जो विचारांचा शब्दरूप प्रवाह माझ्यात आहे, त्याचा उगम शालेय वर्गखोलीतल्या त्या साध्या पण अर्थपूर्ण निबंध वाचनात आहे..हे मी ठामपणे सांगू शकतो.
आजच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर असलेलं माझं प्रेम हे योगायोगानं निर्माण झालेलं नाही. ते आदरणीय सविता देशपांडे मॅडम यांनी दिलेल्या भाषिक जडणघडणीचं फळ आहे, असं मी मानतो मित्रांनो.. त्यांनी ज्ञान दिलं, पण त्याहून महत्त्वाचं..ज्ञानाला संस्कारांची जोड दिली.
काल आमच्या शैक्षणिक परिवाराला आदरणीय सविता देशपांडे मॅडम आणि आदरणीय मुदलियार मॅडम यांची कौटुंबिक सदिच्छा भेट झाली. त्या भेटीनं आमचं घर नव्हे, तर आमचं मन भरून आलं. शिक्षक जेव्हा घरी येतात, तेव्हा ते केवळ पाहुणे नसतात तर ते आशीर्वाद बनून येतात.
या भेटीतही मॅडम थांबल्या नाहीत. आमच्या शैक्षणिक परिवारातील दहावीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला, मार्गदर्शन केलं, आत्मविश्वास दिला. वय वाढतं, काळ बदलतो; पण खरा शिक्षक कधीच शिक्षकपण सोडत नाही..
हे पुन्हा एकदा अनुभवलं..
अशा शिक्षकांना शब्दांत मावणं कठीण असतं. तरीही एवढंच म्हणावंसं वाटतं, " विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे शिक्षक विचारांची मशाल पेटवतात, ते काळाच्या पुढे जगत असतात."
आदरणीय सविता देशपांडे मॅडम..आपण त्याच वर्गातल्या, त्या दुर्मिळ शिक्षकांपैकी एक आहात आणि माझे आदर्श आहात, ह्याचा मला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो..
काल आपण आमच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवारातील दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण व्यक्त केलेल्या भावना माझ्या-विषयी आपला स्नेह आपल्या प्रत्येक शब्दातून व्यक्त केलास त्याबद्दल मी कायम आपला ऋणाकींत राहिल आदरणीय मॅडम..
आपल्या शब्दातील भावना ह्या सदिच्छा आणि आशीर्वादरुपी कायम मला प्रेरणा देतं राहिलं..
कांही व्यक्तीमत्व असतातच अशी !
निरलस निरागस बोलक्या व्यक्तीमत्वाची साक्ष देणारी !
जणू कांही यांचे दिसण्यापेक्षा इतरांसाठी असणे तितकेच महत्वाचे असते . जणू कांही त्यांचे जगणे म्हणजे " मनामनातील वाट होवुनी जाणे " असेच वाटते.. !
आज अशाच विद्यार्थीप्रिय शिक्षकास म्हणजेच मुलासम असणाऱ्या गोडबाळास " भेटण्याचा योग आला . मनाने आधीच वेग घेतला नि निघालो आम्ही दोघी !
मी व माझी मार्गदर्शक जीवनाच्या वाटेवरील मैत्रिण मुदलीयार मॅडम !
कांही गोष्टींना योग्य वेळ यायला लागते तो योग आज मी व माझी बहिणीसम सखी मार्गदर्शक आम्ही दोघी मुलासम असणाऱ्या विद्यार्थ्यांचा मित्र बनुन राहणाऱ्या रफीक उर्फ सरांना भेटण्याचा योग आला..
खूप छान वाटले जाण्यापूर्वीच मन आनंदाने न्हाऊन निघाले स्वच्छ मनाचा दिसणेही तसेच तेजस्वी व वागणेही तसेच व्यक्तीमत्वाला साजेशे !
असा हा रफीक त्याचे घडण्याचे जडण्याचे श्रेप जरी गुरुजनांना देत असला तरी त्याच्या मनाचा तो मोठेपणा आहे . त्याच्यातच सर्वगुण ईश्वराने नियतीने भरभरून दिले होते . . शिल्पकारासही दगडास घडवण्यापूर्वी त्या दगडाचा प्रकार माहित असतो . तेव्हांच दगडासही देवत्व प्राप्त होते आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात भेटतात कांहीच्या येण्याने जीवनाचे सोने होते . आम्ही मात्र निमित मात्र आहोत .
तू च तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस रफीक !
आज तुला प्रत्यक्ष पाहताना शिवाय मोठ्ठ झालेले पाहताना तुझी बहरलेली वंशवेल पाहताना मनास आभाळ ठेंगणे झाले आहे . धन्य मानते मी स्वतःला कुणाला तरी मोठे होत असलेले पाहतांना ! खरंच खूप छान वाटते आहे . आयुष्य असेच आहे कुणा एकाच्या दावणीला आपण बांधलेले नसलो तरी बांधीलकी इतरांशी असणारी सोडता येत नाही.
समाजाकडूनही खुपसा सोशलपणा अनुभवावयास येतो अनेक व्यक्ती या ना त्या कारणांने कुठल्यातरी रूपात कधी नाते कधी मित्र विद्यार्थीमित्र बनून आपल्यासह सोबतीला प्रवास करतात पण त्यातील नेमकीच आखीव रेखीव माणसं आपणा ला जीवनानंद देतात त्यांच्या कृतीने व वृतीने !
असाच हा एक आमचा विद्यार्थी मित्र जो " आज स्वतःची ओळख " विद्यार्थीप्रिय मित्रा म्हणून निर्माण करू शकला ! ज्याला स्वतःची ओळख निर्माण करता येते अशीच माणसं सर्वांच्या हृदयस्थ होतात त्यांना वेगळा परिचयाची औपचारिकता नसते. असो आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा वरचढ अर्थात ज्ञानाने धनाने कत्वाने व मनाने मोठ्ठा होताना पाहताना भावनेचे आभाळरूपी अंतःकरण भरभरून येते .
आज चा क्षणी असेसे नि अस्सेच होत आहे . नेतृत्व कर्तृत्व व दातृत्व हे त्रिगुणात्मक त्रयी गुण तुझ्या ठायी आहेत . आम्ही गुरुजन निर्मित मात्र आहेत . शिवाय " धरती पे रूप माँबाप का या विधात्याचे आशीर्वादही तुझ्या मस्तकी आहेत तुझी पत्नी गृहमंत्री हीने ही संसाररथाची बागडोर व्यवस्थित सांभाळल्या मुळे तुला स्वतःच्या ओळखीचे विश्व तयार करता आले . सुखंटाचे हे वैविध्यपूर्ण फुलपाखरू विविध कार्याचा मंकरंदास्वाद घेताना पाहताना आनंद ही होत आहे . कीती कौतुक करावे या गुणी बाळाचे ! शब्दही थकतील !
शिवाय तू अद्यापनासाठी निवडलेले ठिकाण अद्यापनासाठी निवडलेले विद्यार्थी हेच खरे दैवत आहे . त्यांचेही आशीर्वाद व पाठबळ हेच तुझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे ' तू त्यांना व्यवस्थित समजून घेतल्याने आज अनेकांचे संसार पोटापाण्यास लागले कांही उच्च विद्याविभूषित झाले त्या सर्वांना झालेला मनाचा आनंद हेच तुझ्या सुखी संसाराचे इंगित आहे !
साने गुरुजींचे गीतांतील शब्दांना तू प्रत्यक्षात आणलेस केवळ धडे वा काव्य तू शिकला नाहीस त्यांना तू अंतःकरणापासून " खरा तो एकचि धर्म ओळखलास ! स्वतःही त्यासाठी खूप कष्ट केलेसे तुकारम म्हणतात " अंगी निश्चयाचे बळ 1 याच निर्धाराने तू स्वांतपणे हात न मागता तू अनेकांना हात दिलास !
अस्साच पुढे जात रहा ! जगण्यासाठी आणखी काय हवे ! तुझ्यातील माणुसकी अशीच वृद्धिंगत होवू देत.
" कोशीश करणे वालो की हार नही होती " हेच खरे ! पुढील सुखासाठी तुझ्या ध्येयासाठी स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा !
विद्यार्थी प्रियमित्रा ! तुझे हे कर्तृत्व पाहून मनाला थकायला झाले व प्रेरणाही मिळाली ! जणू काही " छोटी छोटी जलकी बुंदे सागर को भर देती है। बालू की रज नन्ही नन्ही । सुकर भूमी सच देती है। अशाच प्रकारचे तुझे हे " नही ज्ञानेन पवित मिह विद्यते कार्याचे रूप पाहून ! तू तर ज्ञानसागरातील शिंपल्यातील मोती बनून अनेकांचे जीवन " मौक्तिक मय केलेस ! फार अभिमान वाटतो ! भरून येत मन ! " जे जे आपणासी ठावे । ते इतरांशी सांगावे ! ज्ञानी करूनि सोडावे सकळजन । " अशा अनेकांना तुझ्यातील आत्मसात्विक गुणांनी शहाणे करून सोडलेस ! प्रतिकूल परिस्थितीवर मात करून " तुझे जग निर्माण केलेस ! तुझ्या क्षेत्रात प्राप्त यशाचा " मुक्कदर का सिकंदर " तूच आहेस !
आज ज्याचा प्रत्येक शब्द आभाळ होवू पाहत आहे असा सरळ मार्गी सरल मनाचा बोलळ्या वक्तीमत्याचा हा रफीक ! ज्याने आत्मविश्वासान स्वतःचे विश्व तयार केले आहे . असे म्हटले जाते हिमंते मर्दा मददे खुदा " हे वासव असले तरी आजच्या मितीला हा " जिसका कोई नही " अशांचा खुदा झाला आहे . त्याचे कार्याचे मोजमाप कुठल्याही मोजपटीने होणारे नाही अथांग ज्ञान सागरातील हा " मीना आपल्या बहुमूल्य कार्याने " देवमासा " बनला आहे । जसे रुजावे बियाने माळरानी खडकात असा हा आपल्या कर्तत्वाने परिश्रमाने कुठल्याही परिस्थितीत उभारणार आहे.
म्हणतात नां सोन्यालाही सत्यात उतरताना करतोटीस उतरावे लागते तरवत अशाच प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत हा कसोटीला उतरामा आहे आपणासोबत च सर्वांच्याच जीवनाला परिस स्पर्शकरून त्यांच्या जीवनातही आनंदाची रूजवण केली आहे . " ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओवी प्रमाणे " भूतापरस्परे जडो मैत्र जीवांचे " राखले आहे !
पिलांच्या परवात पुरेसे बळ आल्यावर ते ताकतेसह उडणारचं ! पण त्याने घरलाकडे एकदा तरी परतोनि पहावे !
एवढीच आस आहे !
आज त्या प्रिय विद्यार्थीची भेट झाली तेव्हा आठवणींचे आभाळ भरून आले मन स्वगत साधत होते "
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती ।
दोन दिसांची संगत रंगत होत दिसांची नाती ।"
-सविता देशपांडे
(सेवा-निवृत्त सह-शिक्षक, महात्मा फुले विद्यालय, परभणी)
Post a Comment