“ सत्ता बदलणे ही राजकीय घटना असू शकते; पण समाजाच्या मानसिकतेत बदल घडवणे हीच खरी सामाजिक क्रांती असते.” — कॉ. शरद पाटील
मी एक सौंतांत्रिक मार्क्सवादी…!
जयभीम..! लाल सलाम, मित्रांनो..! 🙏🏻
वर्गदास्य आणि स्त्रीजात्यंतक लढ्यासाठी आपले अख्खे आयुष्य समर्पित करणारे प्राच्यविद्यापंडित, क्रांतदर्शी तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारक विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच तीव्रतेने जाणवते.
त्यांची लढाई केवळ सत्तेविरुद्ध नव्हती, तर ती शोषणाच्या प्रत्येक रचनेविरुद्ध, विषमतेच्या प्रत्येक रूपाविरुद्ध आणि माणसाला माणसापेक्षा कनिष्ठ ठरवणाऱ्या प्रत्येक मानसिकतेविरुद्ध होती. त्यांच्या लेखणीतून सर्वहारा, कष्टकरी, वंचित, शोषित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना वैचारिक धार मिळाली.
मार्क्स–महात्मा फुले–डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा सर्जनशील समन्वय साधत त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेचे प्रश्न समजून घेण्याचा स्वतंत्र वैचारिक मार्ग निर्माण केला. त्यांच्या “मा-फु-आ” या वैचारिक मांडणीत आर्थिक शोषणासोबतच जातीय आणि लैंगिक विषमतेच्या मुळांवर प्रहार करण्याचा प्रयत्न दिसतो.
त्यांच्यासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही केवळ संविधानातील शब्दांची चौकट नव्हती, तर ती समाजाच्या प्रत्यक्ष जगण्यात उतरली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.
लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार नव्हे..लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचे धैर्य, मतभेद सहन करण्याची संस्कृती, विवेकाने निर्णय घेण्याची क्षमता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची नैतिक जबाबदारी.
म्हणूनच लोकशाहीचे खरे रक्षण केवळ राज्यघटना, संसद किंवा निवडणुका करत नाहीत, लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे जागरूक, विवेकी आणि प्रश्न विचारणारे नागरिकच तिची खरी ताकद असतात.
आजच्या काळात शिक्षण वाढत असताना विवेक वाढतोय का? माहिती वाढत असताना वैचारिक प्रगल्भता वाढतेय का? आणि राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक व मानसिक गुलामगिरीच्या साखळ्या आपण तोडतोय का.? हे प्रश्न स्वतःला विचारणे अधिक महत्त्वाचे आहे.
कॉ. शरद पाटील यांच्या विचारांचा वारसा म्हणजे एखाद्या व्यक्तीची पूजा नव्हे,तो म्हणजे विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची हिंमत, पुराव्याचा आग्रह, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि माणसाच्या प्रतिष्ठेसाठी अखंड उभे राहण्याची बांधिलकी.
विचारांचा खरा वारसदार तोच, जो विचार पाठ करत नाही,तर विचारांना आपल्या आचरणात उतरवतो.
आज 17 सप्टेंबर, त्यांच्या जयंतीनिमित्त या निर्भीड, संघर्षशील आणि प्रबोधनवादी विचारवंताला कृतज्ञ अभिवादन!
त्यांना खरी आदरांजली म्हणजे..अंधानुकरण नव्हे, तर विवेक; नुसती घोषणा नव्हे, तर कृती; नुसता विरोध नव्हे, तर पर्यायी विचार आणि केवळ स्वतःच्या मुक्तीचा विचार नव्हे, तर सर्वांच्या मुक्तीसाठी संघर्ष..!
जयभीम! जय भारत! लाल सलाम! 🙏🏻
- त्यांचा एक वैचारिक चाहता..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment