🎓 विचारांची प्रगल्भता शब्दांत नव्हे, आचरणात दिसते..!
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्याच्या शब्दांनी होत नाही, तर ती त्याच्या वर्तनातून, निर्णयांतून आणि इतरांशी केलेल्या व्यवहारातून होत असते. कारण बोलणे ही सहज गोष्ट आहे; परंतु बोललेल्या प्रत्येक शब्दाला आपल्या आचरणाची साक्ष देणे, हीच खरी कसोटी आहे.
आज ज्ञानाची कमतरता नाही. पुस्तकं आहेत, व्याख्यानं आहेत, समाजमाध्यमांवर विचारांचे महापूर आहेत. प्रत्येकाच्या ओठांवर नैतिकता, प्रामाणिकपणा, माणुसकी, संस्कार आणि विवेकाचे सुंदर शब्द सहज ऐकू येतात. परंतु प्रश्न हा आहे की, हे विचार आपल्या स्वतःच्या जगण्यात किती उतरले आहेत?
कारण विचारांच्या आरशात स्वतःचा चेहरा पाहणे सोपे नसते.
मानवाच्या अंतःकरणात एक जग असते आणि बाह्य आचरणात दुसरे. या दोन्ही जगांमध्ये सामंजस्य असेल तर व्यक्तिमत्त्वात एक सुंदर सुसंवाद निर्माण होतो, पण अंतर्मन काही सांगत असताना आचरण त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने धावत असेल, तर त्या व्यक्तिमत्त्वाच्या पायाभरणीत हळूहळू तडे जाऊ लागतात.
अंतःकरण आणि आचरण यांच्यातील दरी जितकी वाढते, तितका चरित्राचा पाया कमकुवत होत जातो.
ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे.. एखाद्या विषयावर उत्तम बोलता येणे, शेकडो सुविचार पाठ असणे किंवा मोठमोठ्या तत्त्वज्ञानाची चर्चा करता येणे, यालाच प्रगल्भता म्हणता येणार नाही. खरे ज्ञान तेच, जे माणसाच्या वृत्तीला स्पर्श करते; जे अहंकार कमी करते, विवेक जागवते आणि आचरण अधिक निर्मळ करते.
झाडाच्या मुळांना पाणी मिळाले तरच त्याच्या फांद्यांवर हिरवाई दिसते. त्याचप्रमाणे विचारांच्या मुळांना प्रामाणिकपणा, आत्मपरीक्षण आणि नैतिक आचरणाचे खत-पाणी मिळाले तरच व्यक्तिमत्त्वावर संस्कारांची फळे उमलतात.
अन्यथा विचार केवळ शब्दांच्या फुलदाणीत सजून राहतात..सुंदर दिसतात, पण सुगंध देत नाहीत.
आपण इतरांच्या चुका शोधण्यात जितका वेळ घालवतो, त्यातील थोडा वेळ स्वतःच्या वर्तनाकडे पाहण्यासाठी दिला, तरी अनेक भ्रम दूर होतील. इतरांना सत्य सांगण्यापूर्वी आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत? इतरांना संयम शिकवण्यापूर्वी आपल्या रागावर आपले किती नियंत्रण आहे? माणुसकीची भाषा बोलण्यापूर्वी आपल्या वागण्यात माणुसकी किती आहे? आणि नैतिकतेचे धडे देताना आपल्या स्वार्थाला आपण किती आवर घातला आहे?
हे प्रश्न कठीण आहेत,कारण ते इतरांकडे नाही, आपल्याच अंतर्मनाकडे बोट दाखवतात.
खऱ्या अर्थाने सुशिक्षित असणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे; तर स्वतःच्या विचारांना विवेकाची दिशा आणि आचरणाला नैतिकतेची शिस्त देणे होय. ज्ञानाने जर नम्रता वाढली नाही, तर ते अहंकाराचे अलंकार बनते. शिक्षणाने जर संवेदनशीलता वाढली नाही, तर ते केवळ प्रमाणपत्र ठरते. आणि विचारांनी जर वर्तन बदलले नाही, तर ते केवळ बौद्धिक दिखावा ठरतो.
म्हणूनच आयुष्यात एक सुंदर समतोल साधण्याची गरज आहे,जे मनात आहे, तेच शब्दांत असावे, जे शब्दांत आहे, तेच कृतीत असावे, आणि जे कृतीत आहे, त्याच्याशीच आपले चरित्र प्रामाणिक असावे.
कारण जगाला आपल्या मनातील विचार दिसत नाहीत, जगाला आपले वर्तन दिसते..आपण किती मोठे विचार करतो, यापेक्षा त्या विचारांमुळे आपण किती मोठे माणूस होतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या बोलण्यात किती तत्त्वज्ञान आहे, यापेक्षा आपल्या वागण्यात किती माणुसकी आहे, हेच जीवनाचे खरे मोजमाप आहे.
शेवटी, माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर काळाची सर्वात खरी सही त्याच्या आचरणातून उमटते..शब्द विसरले जातात, भाषणे संपतात, विचारांची चर्चा थांबते,पण माणसाने माणसाशी कसे वागले, हे मात्र स्मरणात राहते.
म्हणून विचार करा, आपण जगाला ज्ञान सांगत आहोत की आपल्या जगण्यातून ज्ञान जगत आहोत?
कारण खरी प्रगल्भता बोलण्यात नसते; ती स्वतःच्या विचारांना स्वतःच्या आचरणाची साक्ष देण्यात असते...आणि ज्या दिवशी अंतर्मन, विचार, शब्द आणि आचरण एकाच दिशेने चालू लागतात, त्या दिवशी माणूस केवळ शहाणा राहत नाही तो विश्वासार्ह, विवेकी आणि खऱ्या अर्थाने सुंदर माणूस बनतो.
-विचार लेखन आणि संपादन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment