“आभासी जगात लोकप्रिय होण्याच्या नादात, वास्तवातील माणूस होणं विसरू नका.”
#अस्वस्थ_वर्तमानातून... ✍️
तंत्रज्ञानाच्या महासागरात पोहताना माणुसकीच्या किनाऱ्यापासून दूर जाणाऱ्या समाजाचे आत्मपरीक्षण करणारा एक सुंदर लेख, मित्रांनो..
आजचा माणूस पूर्वीपेक्षा अधिक जोडला गेला आहे, पण प्रश्न असा आहे की तो नेमका कुणाशी जोडला गेला आहे आणि कुणापासून तुटला आहे? हातात स्मार्टफोन, डोळ्यांसमोर स्क्रीन, जगभरातील माहिती एका स्पर्शावर आणि हजारो ‘फॉलोअर्स’ची आभासी गर्दी… तरीही मनाच्या कोपऱ्यात एक अनामिक पोकळी..!
सोशल मीडियावर शेकडो मित्र असतात; पण मन मोकळं करण्यासाठी एखादा जिवाभावाचा माणूस शोधावा लागतो. घरात चार माणसं असतात; पण प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनच्या जगात हरवलेला असतो. आपण जगाशी क्षणार्धात जोडले गेलो; मात्र घरातील माणसांशी, शेजाऱ्यांशी, समाजाशी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाशीच दूर जात आहोत.
ही केवळ बदलत्या जीवनशैलीची गोष्ट नाही, तर ही सामाजिक आत्मभानाच्या हळूहळू होत चाललेल्या ऱ्हासाची धोक्याची घंटा आहे. तंत्रज्ञान हे माणसाच्या प्रगतीचे अद्भुत साधन आहे; परंतु साधन जेव्हा स्वामी बनते आणि माणूस त्याचा गुलाम होतो, तेव्हा प्रगतीच्या झगमगाटामागे एक अदृश्य अंधार जन्म घेतो...एकटेपणाचा, असुरक्षिततेचा, सततच्या तुलनेचा, चिंतेचा आणि भावनिक तुटलेपणाचा.
#आकडेवारी केवळ संख्या नाही; ती समाजाच्या जखमांचा आरसा आहे!
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2025 च्या सामाजिक संबंधांवरील अहवालानुसार, जगभरातील सुमारे प्रत्येक सहाव्या व्यक्तीला एकटेपणाचा अनुभव येतो. तरुण आणि किशोरवयीन वर्गात ही समस्या विशेष चिंताजनक आहे. सामाजिक एकाकीपणा आणि loneliness यांचा मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
WHO च्या अंदाजानुसार, एकटेपणाशी संबंधित परिस्थितींमुळे दरवर्षी सुमारे 8.71 लाख मृत्यू होतात. म्हणजेच एकटेपणा हा केवळ ‘मन उदास असण्याचा’ विषय राहिलेला नाही; तो सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.
भारताच्या डिजिटल विस्ताराचे चित्रही प्रचंड वेगवान आहे. 2025 च्या सुरुवातीला भारतात 806 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आणि सुमारे 491 दशलक्ष सोशल मीडिया user identities नोंदल्या गेल्या होत्या. आपण डिजिटलदृष्ट्या जगातील सर्वांत मोठ्या जोडलेल्या समाजांपैकी एक होत आहोत; परंतु डिजिटल जोडणी आणि मानवी जवळीक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
भारताच्या National Mental Health Survey 2015-16 नुसार, प्रौढ लोकसंख्येतील सुमारे 10.6% लोकांमध्ये सध्याच्या मानसिक आजाराची लक्षणीय पातळी आढळली होती आणि विविध मानसिक विकारांसाठी उपचारातील तफावत 70% ते 92% इतकी होती. आकडे जुने असले तरी ते आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात..आपण मानसिक आरोग्याला अजूनही पुरेसे गांभीर्याने घेतो आहोत का?
#आपण नेमके कुठे चुकतोय..?
आज घरात आई मुलाशी बोलू इच्छिते; मुलगा मोबाईलमध्ये गुंतलेला असतो...मुलाला वडिलांशी संवाद साधायचा असतो; वडील सोशल मीडियावर व्यस्त असतात...पती-पत्नी एकाच घरात राहतात; पण कधी कधी त्यांच्यामध्ये मैलांचे भावनिक अंतर निर्माण झालेले असते.
मित्र भेटतात; पण गप्पांपेक्षा सेल्फी, संभाषणापेक्षा स्टेटस आणि आठवणींपेक्षा पोस्ट महत्त्वाची ठरते...आपण संवादाची जागा notifications ने, मैत्रीची जागा followers ने आणि आत्मीयतेची जागा likes ने भरून काढण्याचा प्रयत्न करतोय.
पण... एक ‘Like’ तुमची वेदना समजू शकत नाही. एक ‘Comment’ तुमचे अश्रू पुसू शकत नाही...एक ‘Follower’ संकटाच्या क्षणी तुमच्या दारात उभा राहीलच असे नाही.
माणसाला केवळ network नको असते; त्याला नातं हवं असतं...माणसाला प्रेक्षक नको असतात; त्याला आपलेपणाची माणसं हवी असतात.
#दिखाव्याच्या गर्दीत अंतर्मन मात्र उपाशी..!
आजच्या आभासी जगाने ‘मी कसा दिसतो?’ या प्रश्नाला ‘मी आतून कसा आहे?’ या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्व दिलं आहे...इतरांच्या आयुष्याशी सतत तुलना, आभासी प्रतिष्ठेची धडपड, likes आणि comments मधून मिळणारी मान्यता, करिअरची स्पर्धा, आर्थिक असुरक्षितता, कौटुंबिक अपेक्षा, नात्यांमधील ताण आणि सतत online राहण्याची सवय या सगळ्यांनी माणसाच्या अंतर्मनावर अदृश्य ओझं ठेवले आहे.
विशेषतः तरुण पिढीसमोर आपण यशाची शर्यत उभी केली; पण अपयश पचवण्याची मानसिक ताकद किती दिली? आपण त्यांना स्पर्धा शिकवली; पण सहकार्य शिकवलं का? मार्क्स आणि करिअर शिकवलं; पण मनाची भाषा शिकवली का? मोठं होण्याची स्वप्नं दिली; पण पडल्यावर पुन्हा उभं राहण्याचं धैर्य दिलं का?
WHO नुसार जगभर प्रत्येक सात किशोरवयीन व्यक्तींपैकी साधारण एकाला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असते. त्यामुळे ‘तो फक्त मोबाईलवर असतो’, ‘ती जास्त विचार करते’, ‘आजकालची मुलं कमजोर आहेत’ अशा सहज निष्कर्षांपेक्षा त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे...कधी कधी मुलाला सल्ला नको असतो; फक्त कुणीतरी शांतपणे ऐकावं असतं.
#मग उपाय काय..?
उपाय तंत्रज्ञानाला शत्रू मानण्यात नाही; तंत्रज्ञानावर विवेकाचं अधिराज्य प्रस्थापित करण्यात आहे.
1.#Screen Time सोबत Human Time वाढवा..
दररोज काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा...एकत्र जेवा...कुटुंबासोबत फेरफटका मारा...मुलांशी बोला...ज्येष्ठांचं ऐका...मित्राला फोन करा फक्त message नाही...कारण कधी कधी मनाला औषधाची नव्हे, एका जिव्हाळ्याच्या संवादाची गरज असते.
2.#सोशल मीडिया वापरा; त्याला तुमचा वापर करू देऊ नका..
तंत्रज्ञान तुमच्या हातातील साधन असावं; तुमच्या मनाचा मालक नव्हे...अनावश्यक notifications बंद करा. निरर्थक scrolling कमी करा. झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून अंतर ठेवा. घरात आणि कुटुंबात काही ‘No-Screen Zones’ निर्माण करा...मोबाईल चार्ज करण्याइतकंच मनालाही recharge करण्याची गरज असते.
3.#समाजात पुन्हा ‘माणूस’ निर्माण करा..
शेजाऱ्याला ओळखा...ज्येष्ठ व्यक्तीशी दोन शब्द बोला..अडचणीत असलेल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा...गरजू विद्यार्थ्याला मदत करा...सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा...कारण सेवा ही केवळ दुसऱ्याला आधार देत नाही; ती आपल्या आयुष्यालाही अर्थ देते.
4.#शिक्षणात भावनिक बुद्धिमत्तेला स्थान द्या..
शाळा-कॉलेजमध्ये केवळ गुण, परीक्षा आणि करिअरपुरतं शिक्षण मर्यादित राहू नये...संवादकौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, अपयश स्वीकारण्याची क्षमता, ताण-तणाव व्यवस्थापन, डिजिटल शिस्त, सहकार्य, संवेदनशीलता आणि समुपदेशन यांनाही शिक्षणाचा अविभाज्य भाग बनवायला हवं.
कारण हुशार विद्यार्थी निर्माण करणं महत्त्वाचं आहेच; पण संवेदनशील माणूस निर्माण करणं त्याहून महत्त्वाचं आहे.
5.#मानसिक आरोग्याभोवतीची लाज दूर करा..
मानसिक ताण येणं म्हणजे कमजोरी नव्हे...जसं शरीर आजारी पडलं तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो, तसंच मन अस्वस्थ झालं तर समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घेणं ही कमजोरी नव्हे, तर आत्मभानाची खूण आहे.
भारत सरकारची Tele-MANAS सेवा 24×7 मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देते. 14416 किंवा 1800-89-14416 या क्रमांकावर संपर्क करता येतो.
6.‘मी’ पासून ‘आपण’कडे प्रवास करा,मित्रांनो..
आत्मकेंद्री जीवनशैली माणसाला सुविधांनी श्रीमंत करते; पण नात्यांनी गरीब करू शकते...म्हणून माझं यश → समाजाची प्रगती, माझं ज्ञान → दुसऱ्यासाठी संधी, माझा वेळ → कुणासाठी तरी आधार, माझं सामर्थ्य → कुणासाठी तरी मदत ही जीवनदृष्टी रुजवावी लागेल.
कारण माणूस केवळ स्वतःसाठी जगला तर जीवन जगतो; पण इतरांसाठी जगला तर जीवनाला अर्थ देतो.
#शेवटी प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही… आपल्या निवडीचा आहे..!
तंत्रज्ञान शत्रू नाही...मोबाईल शत्रू नाही...सोशल मीडिया शत्रू नाही...खरा प्रश्न आहे, आपण त्यांचा वापर करतोय की ते आपला वापर करत आहेत?आपल्याला ‘Connected World’ मधून ‘Connected Humanity’ कडे प्रवास करावा लागेल.
भविष्यातील सर्वांत मोठी गरज कदाचित अधिक वेगवान इंटरनेटची नसेल; तर अधिक जिवंत संवादाची असेल...आपल्याला अधिक followers नकोत; अधिक विश्वासू माणसं हवीत.अधिक likes नकोत;
अधिक आपलेपणा हवा.अधिक online presence नको; अधिक human presence हवी.
आणि सर्वांत महत्त्वाचं, मित्रांनो..
मुलांना जग जिंकायला शिकवण्यापूर्वी, स्वतःच्या मनाशी मैत्री करायला शिकवलं पाहिजे...कारण, " समाज तंत्रज्ञानाने आधुनिक होतो;
पण माणुसकीने सभ्य होतो."
आज गरज आहे मोबाईल खाली ठेवण्याची,माणसाकडे पाहण्याची, मनापासून ऐकण्याची, हातात हात देण्याची, दुःखात धावून जाण्याची आणि पुन्हा एकदा ‘मी’ नव्हे, ‘आपण’ म्हणून जगण्याची..! कारण माणूस एकटा पडला की समाजाची गर्दी वाढत नाही; फक्त पोकळी वाढते.
म्हणून तंत्रज्ञानाच्या प्रकाशाला नाकारू नका; पण त्याच्या झगमगाटात माणुसकीची ज्योत विझू देऊ नका..कारण अखेर किती लोक तुमच्याशी online जोडलेले आहेत, यापेक्षा किती माणसं तुमच्या मनाशी जोडलेली आहेत यावरच तुमच्या आयुष्याची खरी श्रीमंती ठरते, बरं का..!
- एक संवेदनशील जीवनप्रवासी.. ✍️
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment